ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

ब्युटीफुल म्हातारा?

रानफुले-म्हातारा 

Botanical name- Sonchus oleraceus

Family- Compositae (Asteraceae) 

                                            हा 'ब्युटीफुल म्हातारा' तुम्हाला रानवाटांवर कुठेतरी नक्की भेटेल. ही एक वर्षायू वनस्पती आहे.  शेतात, पिकांत, पडीक जागेवर, गवताळ कुरणांंमध्ये आढळेल! एक तण म्हणून दुर्लक्षित असले तरी याची सोनेरी पिवळी फुले खूपच आकर्षक दिसतात.

 सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर उमलणारी ही फुले दुपार व्हायच्या  आत मिटून जातात. साधारण एक ते दीड फूट उंच वाढते. या वनस्पतीची पाने विचित्र (कातरलेली) आकाराची असतात. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' या लावणी गीतात याचे पान बसत नाही. कारण पानांना देठच नसते. पाने खोडाला चिकटलेली असतात. पानांच्या किनारीवर छोटे काटे असतात. पानांमध्ये कडू, पांढरा चिक असतो.
 
या वनस्पतीचे फळ म्हणजे पांढऱ्या केसांचा पुंजका असतो. हा पुंजका म्हाताऱ्याच्या (सांताक्लॉजच्या?) दाढीसारखा पांढरा दिसतो म्हणूनच या वनस्पतीस म्हातारा  हे नाव पडले असावे.
केसाळ पॅराशूटच्या साहाय्याने या वनस्पतीच्या बिया रुईच्या बियांप्रमाणे (म्हाताऱ्या) वाऱ्याबरोबर दूरवर उडत जातात. ज्या ठिकाणी हे पॅराशूट land होईल तेथील मातीत ते बीज रुजते आणि मग सुरु होतो नव्या जीवनाचा सुंदर प्रवास!


थोडं थांबायला हवं..

...रानफुलांच्या वाटेवर..!

                हे स्पर्धेचे युग आहे आणि आपण धावायला हवं ! थांबला तो संपला ! असं म्हणून आपण धावत असतो. रात्रंदिवस. पण कधी तरी, कुठेतरी आपण थांबायला हवं. आपल्या समाधानासाठी. सुखासाठी. हे सुख कुठे मिळेल? हे समाधान कुठे मिळेल? निसर्गात! चराचरात! अगदी रस्त्याच्या कडेला, Haighway च्या कडेलाही मिळेल! 
थोडं रस्त्याच्या कडेला थांबा तुम्हाला विविध रानफुले दिसतील. आजूबाजूच्या झुडूपांना आपल्या बाहुपाशात घेऊन त्यांच्या आधारे वाढणाऱ्या व सुंदर फुलांनी बहरलेल्या प्रभातवेली (morning glory) दिसतील. त्यांचे सौंदर्य अनुभवा. तुम्हाला नक्कीच एका स्वर्गीय सुखाचा अनुभव होईल. आता मी हे तुम्हाला का सांगतोय? कारण असा अनुभव मी नेहमी घेतो. 
            
    औरंगाबाद-नाशिक हायवेवर येवला व विंचूरच्या दरम्यान एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या शुभ्र फुलांची प्रभातवेली (morning glory) असंच आपलं लक्ष वेधून घेते. तिला टाळून पुढे जाणं कुणाही निसर्गप्रेमीस अशक्यच! खूपच  सुंदर दिसते ही वेली! मी जेव्हा जेव्हा तेथून जातो तेव्हा तेव्हा तेथे थांबून वाऱ्यावर डोलणारी ती शुभ्र, चांदणी सारखी फुले न्याहाळत असतो. फुलाचा आकार अगदी कागदावर पंचकोन काढल्यासारखा. मध्यभागी चांदणी आणि त्या चांदणीच्या कोंदणात जणू जांभळ्या रंगाचा पाचू जडलाय! पाहताच त्यांची छबी मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह होतो...कितीही क्लिक करा. समाधान होत नाही. किती भारी अनुभव असतो तो! स्वतःला क्षणभर विसरण्याचा! आपण ज्याला सुख-समाधान म्हणतो ते यापेक्षा वेगळे असते का? या प्रश्नाचे उत्तर मी आपणांवर सोपवितो. रस्त्याने जातांना थोडं थांबायला शिका म्हणजे माझं म्हणणं नक्की पटेल.


या नावात दडलंय काय?

रानफुले- हेमांगी 

Botanical name-Hibiscus panduriformis 

Family- Malvaceae 

              नावात काय असतं? असं नेहमी म्हंटलं जातं ! 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हणच या प्रश्नाचे उत्तर देते. असं असलं तरी कधी कधी नाव ठेवतांना गुणांचा विचारही केला जातो. तसं आपण नेहमी कुणाला नी कुणाला नावे ठेवण्यात पटाईत असतोच! असो..
            आज आपण नावाबद्दल बोलतोय ते 'हेमांगी' या वनस्पतीच्या नावामुळे. सध्या या वनस्पतीच्या फुलांचा बहार चालू आहे. पिवळ्याधमक रंगाची व मध्यभागी लाल असणारी ही फुले सुर्यफुलासारखी सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देतात. उमललेल्या फुलांची मुखे बहुतेक दक्षिणेकडे म्हणजे सूर्याच्या दिशेने दिसतात. नोव्हेंबर-डिसेंबर हा फुले फुलण्याचा काळ असतो. आता हंगाम संपण्यापूर्वी रानवाटेवर फेरफटका मारून या फुलांचे सौंदर्य न्याहाळायला हवे. चला तर मग! 
            ......तर आपण हेमांगी नावाची चर्चा करत होतो. हेम म्हणजे सोने! जिचे अंग सोन्यासारखे असते अशी ती 'हेमांगी'..! या वनस्पतीचे खोड पिवळ्या रंगाचे असते व वनस्पतीच्या सर्वांगावर (खोड व पानांवर) बारीक केसांसारखी चमकदार लव असते. त्यामुळे या वनस्पतीचे अंग सोन्यासारखे चमकदार दिसते म्हणूनच या वनस्पतीचे  नाव हेमांगी पडलेय! आता कळले नावात काही नसते असं नसतं! नावातही काहीतरी असतं..!



छान किती दिसते..!

छान किती दिसते...

फुपारू

                हा कुठे प्रश्न होवू शकतो? निःसंशय नाही होवू शकत! 
सृष्टीच्या अद्भुत सौंदर्यातील मुकुटमणी म्हणजे ही चंचल, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरे!
फुलपाखरे नाव उच्चारताच आपले मन बालपणात डोकावू लागते. किती तरी वेळा आपण त्यांचा पाठलाग केलेला असेल. त्यांना हातात पकडलेले असेल. त्याचा स्पर्श अजूनही जाणवत असेल नाही! त्यांचे ते विविध रंग. त्यांचे ते हवेत भिरभिरणे. गिरक्या घेणे. सारे कसे मनमोहक असते. रानवाटेवर रानफुलांच्या सहवासात उच्छृंखलपणे बागडणारी फुलपाखरे पाहणे यासारखी रमणीय गोष्ट दुसरी नाही! या फुलांवरून त्या फुलांवर बसून फुलांतील गोड मकरस चाखणारी फुलपाखरे पाहून आपण त्यांच्या सौंदर्याने मुग्ध होवून जातो. म्हणूनच अशा फुलपाखरांना कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह प्रत्येकास होत असतो! 
                परंतु या चंचलतेला कॅमेऱ्यात बंदिस्त करणे खूपच अवघड असते. काही थोडेच क्षण मिळतात आपल्याला त्यांना टिपायला. या थोड्या क्षणात आपल्या मनासारखा क्लिक यायला खूपच परिश्रम घ्यावे लागते. ती एक एकाग्रतेने करायची साधनाच असते. या साधनेचे मनासारखे फळ मिळायला खूप वेळ लागतो. परंतु या चंचलतेला टिपण्याची योग्य वेळ असते सायंकाळची! दिवसभर हुलकावणी देणारी ही फुलपाखरे सायंकाळी निवांतपणे गवताच्या पात्यांवर, झुडुपांच्या पानावर विसावतात. ही संधी साधून आपण त्यांचे हे सौंदर्य टिपू शकतो. नशिबाने साथ दिली तर एक अलौकिक दृश्य आपण टिपू शकतो! चला तर मग रानवाटांवर!
        
    आज मी येथे #Joker या फुलपाखराची काही छायाचित्रे व मोबाईलद्वारे घेतलेला एक अफलातून video शेअर करत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. 
            Joker या फुलपाखराचे शास्त्रीय नाव 
Byblia ilithyia Drury आहे. 
निम्फालीडी या कुळातील हे फुलपाखरू आहे. 
MI redmi Note 8 मोबाईलद्वारे shoot केलेला हा video slow motion नाही.

(सदर video माझ्या On the road या youtube channel वर उपलब्ध आहे.)











 

रुपेरी उन्हात धुके दाटलेले...

रुपेरी उन्हात धुके दाटलेले...

            आजची सकाळ उगवली ती दाट धुक्याची चादर पांघरूण. अगदी जवळचेही दिसत नव्हते. वातावरणात खूपच शांतता होती. एरव्ही ऐकू येणारा पाखरांचा कलकलाट शांत होता. फक्त कुठे कुठे त्यांची कुजबुज ऐकू येत होती. त्यांनी अजूनही घरटी सोडलेली नव्हती. 

        असे धुके पडले की माझ्या ओठांवर 'बाळा गाऊ कशी अंगाई?' या चित्रपटातील आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी मधाळ स्वरात गायिलेल्या 'धुंदीत गाऊ….' या नितांत सुंदर गीतातील...

रुपेरी उन्हात धुके दाटलेले,

दुधी चांदणे हे जणू गोठलेले

            ........या ओळी येतात. हे संपूर्ण गीतच खूप श्रवणीय आहे. 
सृष्टीच्या रंगमंचावर असा धुक्याचा पडदा पडला की, अजून एक नाट्य जन्मास येते!  
                                        एका कलाकाराची कला या धुक्यात अचानक उठून दिसते.

झुंबर ?
    हा कलाकार म्हणजे 'कोळी'(spider)! एरव्ही कुणाच्याही दृष्टीस सहसा न पडणारी कोळ्यांची जाळे धुक्यातील पाण्याच्या कणांनी ओथंबून जातात आणि त्यातून दृष्टीपथात येते ती त्यांची कला! धुक्यातील दवांच्या थेंबामुळे ही जाळी रुपेरी मोत्यांची वाटू लागतात. त्यात सौम्य सूर्यकिरणे जर या जाळ्यावर पडली तर हिऱ्यांसारखे चकाकतांना दिसतात. कोळ्याच्या जाळ्यांचे असंख्य प्रकार या धुक्यानेच पाहायला मिळतात. जिकडे तिकडे जाळीच जाळी दिसायला लागतात.

आकाशगंगा ?


        ही काही छायाचित्रे पाहून कोळ्यांची कला व मेहनत आपणास दिसून येईल. धुक्याच्या स्पर्शाने ही जाळी कलेचा एक उत्तम नमुना म्हणून भासू लागतात. जेंव्हा जेंव्हा असे धुके पडेल तेव्हा तेव्हा थोडं बाहेर पडा. रानवाटेवर तुम्हाला हे अद्भुत सौंदर्य नक्कीच अनुभवायला मिळेल! 
हिऱ्यांचा हार ?














रानफुले पेटारी

पेटारी (Indian Mallow)

Botanical name: Abutilon Indicum

Family: Malvaceae 

        आपल्या पिवळ्याधमक फुलांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या फळांनी लक्ष वेधून घेणारी ही वनस्पती मुद्रिका, कांगोरी या नावानेही ओळखली जाते. फळांचा  आकार बंद पेटीसारखा असतो म्हणून कदाचित या वनस्पतीस पेटारी हे नाव मिळाले असावे. ही पेटी उघडली की आतील बियांचा खजिना दृष्टीस पडतो.
या पेटीमध्ये दडलंय काय?
                जवळजवळ वर्षभर फुलणारी ही वनस्पती शिशिर आणि वसंत ऋतूत अधिकच बहरते. पेटारी नावाचा एक मोठा वृक्षही असतो. पण आपण आता ज्या वनस्पतीबद्दल  बोलतोय ती छोटेखानी एक ते दोन मीटर उंच वाढते. पाने साधी  हृदयाकार असतात. पानांच्या कडा दातेरी असतात. पडीक जागेत, शेतात, बांधावर उगवलेली दिसते. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत. 

सध्या या वनस्पतीच्या फुलांचा बहर जोमात आहे. तेव्हा बाहेर पडा आणि चला रानवाटेवर पेटारीचे सौंदर्य पाहायला!



  


रंग बदलणारी फुले.....!

 रंग बदलणारी फुले.....!

मराठी नावे:- टणटणी, घाणेरी, गुलतुरा 

शास्त्रीय नाव (Botanical name):- Lantana camara

कुल (Family):- Verbenaceae
        सुंदर आणि विविधरंगी रंगांच्या फुलांनी नटलेली ही काटेरी वनस्पती महाराष्ट्र व कर्नाटकात मोठया प्रमाणात आढळते. या वनस्पतीची पाने साधी व खरबरीत असतात. पाने चुरगळल्यावर उग्र दर्प येत असल्याने कदाचित तिला मराठीत 'घाणेरी' हे नाव पडले असावे. खरंतर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून पाहुणी म्हणून आलेली ही वनस्पती येथील वातावरणात इतकी बेमालूमपणे मिसळलीय की ती आता स्थानिक वाटायला लागलीय. डचांनी हिला प्रथम युरोपात आणली. तेथून ती श्रीलंकामार्गे भारत आणि इतर आशियायी देशांत पसरली.

सदा हिरवीगार असते. वर्षभर रंगीबेरंगी फुलांनी नटलेली असते. विविध फुलपाखरे व मधमाश्यांना आकर्षित करते.
काटेरी (घनदाट) असल्याने व पाने विषारी असल्याने गुरे त्यांना खात नाही. गुरांपासून संरक्षण होत असल्याने कुंपणासाठी आणि सुंदर फुलांमुळे बागेत शोभेसाठी या वनस्पतींची सुरुवातीस लागवड केली गेली. मात्र काही दिवसांतच या वनस्पतीच्या फायद्यांपेक्षा नुकसानीची जाणीव झाली. ‘भटाला दिली ओसरी नी भट हातपाय पसरी’ या म्हणीप्रमाणे ही वनस्पती जगभरातील 50 ते 60 देशांत आक्रमकपणे फोफावली. पडीक राने, गवताळ कुरणे, रस्त्याच्या कडेने या वनस्पतींची ताटवे च्या ताटवे फुलू लागली म्हणण्यापेक्षा फोफोवू लागली. एक #Invasive_species (वेगाने फैलावणारी आक्रमक जात) म्हणून आज ती बदनाम झाली आहे. या वनस्पतीचे झुडूप खूपच फोफावते साधारण १० ते १२ फुट व्यासा इतकी उपयुक्त जागा एकच झुडूप अडवून बसते. गवताळ जागेवर जर असे झुडूप वाढले तर त्याच्या छायेखाली गवत उगवत नाही. यामुळे गवताळ कुरणे झपाट्याने कमी होण्याचा धोका या वनस्पतीमुळे निर्माण झाला आहे. फुले यायच्या आधीच ही वनस्पती उपटून टाकणे या एकाच उपायाने तिचा बिमोड होऊ शकतो. इतर कोणत्याही मार्गाने तिचा बिमोड होणे अवघड आहे. पर्यावरणवादी आणि शेतकरी सर्वांनाच या समस्येची जाणीव झाली आहे.

        तरीही या वनस्पतीच्या फुलांच्या सौंदर्याबाबत मात्र वाद होऊ शकत नाही. विविध रंगछटा धारण रणारी ही फुले उमलल्यानंतर दिवसागणिक त्यांच्या रंगात बदल होत जातो. फिकट गुलाबी दिसणारी फुले काही दिवसांत गर्द गुलाबी दिसतात. सुरुवातीस केशरी दिसणारी नंतर गर्द लाल दिसतात. गुलाबी-पिवळी, केशरी-लाल, गुलाबी-पांढरी अशा अनेक रंगांच्या मिश्र छटा या फुलांत दिसून येतात. या गुणांमुळेच अनेक बागांतून यांचे अस्तित्व दिसून येते. कृत्रिम संकराने एकाच रंगाच्या/मिश्र रंगांच्या अनेक जाती विकसित करून बागांमध्ये लावल्या जात आहेत. विविध रंगांची फुलपाखरे या फुलांकडे आकर्षित होत असल्याने अनेक ठिकाणी #Butterflies_parks मध्ये या वनस्पतीची विविधरंगी फुलझाडे लावली जातात.

        या वनस्पतीला हिरव्यागार फळांचे घोष येतात. ती पिकल्यावर काळी होतात. बालपणी बऱ्याच जणांनी या फळांचा आस्वाद नक्कीच घेतला असेल. आम्हीही घेतला आहे. एक मजेची(?) गोष्ट म्हणजे ही फळे विषारी असतात. सुदैवाने आपल्याला काही झाले नाही! पोट दुखी, मळमळल्यासारखे झालेही असेल पण बालपणीच्या नेहमीच्या तक्रारी म्हणून आपण दुर्लक्ष केले असेल किंवा आपले नशीब चांगले म्हणायचे!

        आपल्या सुंदर फुलांनी सृष्टीच्या सौंदर्यात भर घालणारी ही टणटणी सर्वांनाच आकर्षित करते हे नक्की..! चला तर मग रानवाटेवर या फुलांचे सौंदर्य पाहायला.!





 

ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज .. 

                रान (wood)एक दोन अक्षरी शब्द! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात. मन पाखरू होते आणि मग ते हिरव्यागार रानावरून फेरफटका मारायला लागते! डोळ्यासमोर बालपण नाचायला लागते आणि पायाखाली असतात त्या 'रानवाटा' ! काही ओळखीच्या काही अनोळखी ! या रानवाटांवर ऐकू येतो पाखरांचा किलबिलाट! बालमित्रांच्या एकेरी हाका आणि खिदखिदाट!कुणाच्या हातात असतात आंबट चिंचा-बोरे तर कुणाच्या हातात हिरव्याकंच कैऱ्या! खरं शेअरिंग तर रानातच व्हायचंरानमेव्याचे, विचारांचे आणि निर्मळ मनांचे!

                मी जन्मलो, वाढलो आणि बागडलो रानातच. घरची गरिबी असली तरी रानाची समृद्धी(हिरवाई) तिची धग जाणवू देत नसायची! सवंगड्यांबरोबर रानवाटा तुडविताना दिवस कसा भुर्रकन संपून जायचा. दुःख, वेदना असं काही असतं असं जर कोणी तेव्हा म्हंटलं असतं तर त्याला आम्ही वेडाच म्हंटलो असतो. या रानवाटांवरून फाटक्या चड्ड्या घालून, अनवाणी पायांनी काट्याकुट्यातून पळताना कधी वेदना जाणवल्या नाही कारण रानाचा गुणच असा होता जिथे वेदनांनाही पराभव मान्य करावा लागायचा.

                ती रांनपाखरं, ती रानफुलं, ती रंगीबेरंगी फुलपाखरं, त्या गुंजारव करणाऱ्या मधमाश्या, ते भुणभुणणारे भुंगे, तो आंबट-गोड रानमेवा, तो भरारा रानवारा, ती मंद शीतल झुळूकतो धुंद कोसळणारा पाऊस,अलगद मंद ओघळणाऱ्या श्रावणसरीसारं सारं वेड लावणारं! सहा ऋतूंचे सहा सोहळे अद्भुतपणे दाखविणाऱ्या  या रानवाटा  बालपणापासून  वेड लावत आलेल्या आहेत . या रानवाटांवरून हुंदडत असतांना मला भावलेले, मी अनुभवलेले रानमाझ्या नजरेला दिसलेले रानया रानातील गुजगोष्टी मला आज कुणाशी तरी शेअर कराव्याश्या वाटताय म्हणूनच हा #blog लिहिण्याचं धाडस करतोय. मी कोणी सिद्धहस्त लेखक नाही की कोणी अभ्यासक! मी एक साधा #रानवेडा आहेआशा आहे आपणांस माझा हा व्यक्त होण्याचा प्रयत्न आवडेल!

                वाचन, पक्षीनिरीक्षण, रानफुलांची ओळख, फुलपाखरांचा अभ्यास, रानातील भटकंती आणि जे दिसेल ते वहीत आणि कॅमेऱ्यात टिपण्याचे वेड लागलं ते ह्या रानवाटांवरच ….! 

                 #Twitter वर रानवेडा @fx_format या नावाने मी active असलो तरी. चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी ट्विटर च्या मर्यादा लक्षात घेता अधिक मोठ्या platform ची मला आवश्यकता वाटली म्हणून या ब्लॉगचे प्रयोजन! या ब्लॉगसाठी मला प्रोत्साहीत करणाऱ्या माझ्या सर्व ट्विटरकर मित्रांचे आभार..!

            चला तर मग माझ्याबरोबर या रानवाटांवर ..!

आपणांस ब्लॉग कसा वाटला, आपण काही सूचना करू इच्छित असाल तर नक्की लिहा. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत असेन.