ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

रानवाटेवरील रानभेंडी

रानभेंडी 

रानात, शेतात  फेरफटका मारताना ऑक्टोबर महिन्यात रानभेंडीची पांढरी किंचित गुलाबी छटा असणारी फुले लक्षवेधून घेतात. आज रानात फेरफटका मारताना वाऱ्याबरोबर डुलणारी ही सुंदर फुले दिसली. हिवाळ्याची सुरुवात म्हणजे या फुलांच्या फुलण्याचा काळ असतो. पाच पांढऱ्या पाकळ्यांची ही जास्वंदासारखी फुले मध्यभागी केंद्राजवळ जांभळ्या ठिपक्याने सजलेली असतात. सुरुवातीस पांढऱ्याशुभ्र असणाऱ्या पाकळ्यांना नंतर किंचित गुलाबी छटा येते. 

            भेंडी या फळभाजी सारखीच फळे येत असली तरी ती लांबीने आखूड व आकाराने वेगळी असतात. फळांवर बारीक काटे असतात. चिकट पांढऱ्या द्रवाच्या थेंबानी या फळांवर दहिवर पडल्यासारखे भासते. पानांवरही बारीक काटे असतात. त्वचेला त्यांचा स्पर्श झाल्यास त्वचेला खाज येते. थोडे जपूनच फुलांचे सौंदर्य न्याहाळावे! 
                खाण्यासाठी नसला तरी या फळांचा उपयोग एका खास कामासाठी केला जातो! गुळ तयार करताना उसाच्या उकळत्या रसातील मळी (अशुद्ध घटक) काढून टाकण्यासाठी या भेंडीच्या फळांचा उपयोग होतो. भेंडीची फळे कुटून उकळत्या रसात टाकली की त्यातील मळी व इतर चोथा वरती तरंगतो नंतर तो काढणे सोपे होते. आहे की नाही ही उपयोगी भेंडी! 
रानभेंडीची फळे
थोडी शास्त्रीय माहिती जिज्ञासूंसाठी :
Botanical name: Abelmoschus ficulneus 
Family: Malvaceae
अधिक माहिती येथे क्लिक करून Flowers of India च्या वेबपेजवर जा! 


थोडी अधिक छायाचित्रे आपल्यासाठी 👇

फुल व फळांसह फांदी 



आरोग्यवर्धक रानभाज्या

 माठ व तांदुळ कुंद्रा  

        श्रावण सरींचा वर्षाव झाला की जमिनीत निद्रिस्त असणाऱ्या बीजांना धुमारे फुटतात आणि त्यातूनच जन्म घेतात काही रानभाज्या! शेतातील तण म्हणून किंवा गुरांचे खाद्य म्हणून सामान्यपणे दुर्लक्षित होणाऱ्या काही रानभाज्या या चविष्ट आणि आरोग्यवर्धक असतात. आपल्या आहारात त्यांचा समावेश जाणीवपूर्वक करायला हवा. रानभाज्यांमध्ये क्षार व जीवनसत्वे असतात. तसेच फायबर-जे की अन्न पचायला मदत करतात- भरपूर असतात. पोट भरण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचे काम या रानभाज्या करतात. मग चला तर रानवाटेवर आणि जाणून घ्या काही रान भाज्यांबद्द्ल.

माठ
Botanical name: Amaranthus viridis 
Family: Amaranthaceae
        ही एक वर्षायू वनस्पती आहे. पावसाळ्यात शेतात व इतरत्र उगवते. ग्रामीण भागात अगदी चवीने खाल्ली जाणारी ही भाजी आहे. आमची आज्जी नेहमी म्हणायची ही देवांची आवडती भाजी आहे. धार्मिकदृष्ट्या हिंदुधर्मात या भाजीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
        'श्रावण महिन्यात दर शनिवारी हिंदू लोक पंच-भेळी-भाजी नावाची भाजी करतात. त्यातील पाच भाज्यांत माठाचा समावेश असतो. ही भाजी देवांना आवडते अशी समजूत आहे. इतर चार भाज्या उपलब्ध नसल्या, तरीही फक्त माठाची भाजी करतात, एवढे त्या भाजीचे महत्त्व आहे.' अशी माहिती मराठी विश्वकोशात  या भाजीबद्दल दिलेली आहे.
        अशा या चविष्ट भाजीची चव एकदा चाखायलाच हवी.
 


तांदुळ कुंद्रा 
Botanical name: Digera muricata
Family: Amaranthaceae 
        मराठीत गेठण,कुंजर या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीच्या पानांची भाजीही चविष्ट असते.या भाजीच्या फुलांच्या मंजिऱ्या तांदळाच्या दाण्यांसारख्या दिसत असल्यामुळे तिला मराठीत तांदुळ कुंद्रा म्हणत असावेत!
        ही भाजीही वर्षायू असून पावसाळ्यात उगवते. 
        रानभाज्यांची पाककृती अगदी सोपी असते. तेल, तिखट, मीठ एव्हढे असले तरी पुरेसे असते. 
इतर कोणतेही चविष्ट मसाले न वापरता या भाज्या शिजविल्या तरच  त्यांची खरी नैसर्गिक चव कळते. या भाज्या शिजविताना पाणी टाकून शिजविण्याची अजिबात गरज नसते. पानांमधील पाणीच पुरेसे ठरते. भाजी शिजताना आपोआप हे पाणी बाहेर पडते. 
चला तर मग या भाज्यांचा भरपूर आस्वाद घेवूया.!

कु...कु...कू कोंबडा

पावसाळा म्हंटला की रानवाटेवर सर्वत्र हिरवळ पसरते. या हिरवळीत वेड्यावाकड्या वाढणाऱ्या वेली, गवत, छोट्या-मोठ्या रान वनस्पती असतात. या वाटेवर असंच एखादं  कुरडूचं फुल आपलं लक्ष वेधून घेतं. टोकाला गुलाबी आणि खाली सफेद असणारे कणासासारखे हे फुल अनेक छोट्या छोट्या फुलांनी सजलेले असते. वाऱ्याबरोबर डोलणारा हा कोंबडा फारच सुरेख दिसतो. चला तर जाणून घेवूया या रानफुलाची माहिती!

 

कुरडू:
Botanical name: Celosia argentea   
Family: Amaranthaceae  

             ही एक लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती आहे. पावसाळ्याच्या शेवटी भारत,नेपाळ, भूतान, चीन, जपान, कोरिया, उष्णकटिबंधीय आफ्रिका खंडात 500 ते 1600 मीटर उंचीवर आढळते. ही हिमालय आणि पश्चिम घाटातही आढळते.एक तण म्हणून या वनस्पतीकडे पाहिले जाते. या वनस्पतीची उंची साधारण 60 ते 75 सेमी पर्यंत असते. खोड व फांद्या पन्हाळीदार, पाने साधी, विविध, एकाआड एक अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी फुले सप्टेंबर–डिसेंबरमध्ये येतात. बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात. 

Celosia plumosa, celosia cristata   या कुरडूच्या काही शोभिवंत जाती बागेत लावतात.

वाळल्यानंतर ही फुले चांदीसारखी चमकदार दिसतात म्हणून इंग्रजीत यांना 'Silver Cockscomb' म्हणतात. मराठीत कुर्डू, कोंबडा या नावांनी ओळखतात. याच्या पानांची भाजीही करतात. चला तर मग रानवाटेवर या कुरडूला शोधायला. 


 

तीच चंद्रकोर नभात..!

श्चिमेच्या आकाशात आज संध्याकाळी शुक्राच्या साथीने तृतीयेची चंद्रकोर झळाळत होती! मध्येच काळ्याभोर ढगांच्या पडद्याआड अदृश्य व्हायची. पावसामुळे वातावरण स्वच्छ असल्याने अगदी sharp दिसत होती! अंधार जसजसा वाढूू लागला तसतसे तिचे सौंंदर्य अधिकच खुुलत गेेलेे. 
Clicked at 20x optical zoom
clicked at +20x digital zoom

किल्ले रतनगड

प्रवरेच्या उगमस्थानी 

Lockdown च्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 15 जानेवारी रोजी मित्रांबरोबर घरातून बाहेर पडलो. कुठे जायचे? अंजनेरी, मुल्हेर, रतनगड? शेवटच्याक्षणी रतनगडावर शिक्कामोर्तब झाले आणि निघालो. १२० कि.मी. चा प्रवास! ३ मोटारसायकल, ६ स्वार! सूर्योदयापूर्वी प्रवास सुरु झाला. 
                अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे धरतीवरील स्वर्गच जणू! निसर्गसौंदर्याचा असा काही वरदहस्त येथील भूमीस लाभला आहे की, स्तिमित व्हायला होते. एकदा तुम्ही या भूमीवर पाय ठेवला की पुन्हा घरी जाऊच नये असे वाटते. पावसाळ्यात तर या स्वर्गीय भूमीचे सौंदर्य कल्पनातीत असते. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर धो-धो कोसळणारा पाऊस, ते खळखळून वाहणारे झरे, बेलगाम कोसळणारे धबधबे सारं काही मंत्रमुग्ध करणारं! गिरिप्रेमींना नेहमीच खुणावणारे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथेच आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड आणि विश्रामगडासारखे इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे किल्ले या भूमीत आहेत. अमृतेश्वर-हरिश्चंद्रेश्वरासारखी प्राचीन शिवलये या भूमीत आहेत. अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले प्रवरा (अमृतवाहिणी) नदीवरील भंडारदरा धरण येथेच आहे.  अशा या निसर्गसंपन्न अकोले तालुक्यातील रतनगड हा एक किल्ला आहे.
दुरूनच खुणावणारा किल्ले रतनगड 
हा किल्ला सुमारे 2000 वर्षे जुना आहे. प्रवरा अर्थात अमृतवाहिणी नदीचा उगम  किल्ल्यावर होतो रतनवाडी गावामधून या किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. प्रवरा नदीच्या प्रवाहाच्या कडेने ही वाट जाते. साम्रद गावातूनही एक मार्ग आहे. आम्ही रतनवाडीच्या वाटेने चढाई केली. साधारण ३ कि.मी. चालल्यानंतर तुम्ही रतनगडाच्या पायथ्याजवळ पोहोचतात. तरीही अजून दाट झाडीतून, कारवीच्या झुडूपांतून जाणारी पायवाट लांबच लांब वाढत चाललीय असे वाटते. खुट्याच्या डोंगराचा सुळका व रतनगडाचे शिखर तेव्हडे दिसते.

 
दाट झाडीतून चालताना मध्येच पाऊस, वादळाने उन्मळून पडलेले मोठे वृक्ष वाट अडवितात.
वाट अडविणारी कोसळलेली झाडे..!
 
त्यांच्या खोडा खालून किंवा वरून जावून पुढे मार्गक्रमण करत राहावे. वाट दाट झाडीची असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही व चढाईही रमणीय होते. थकवा जाणवत नाही. कुठे कुठे चढण आव्हानात्मक, दमछाक करणारी आहे. शेवटच्या टप्प्यात लोखंडी शिड्यांवरून चढून जावे लागते. थोडं जपून जावे. मग लागतो गणेश दरवाजा. यातून आत गेल्यावर उजव्याबाजूला काही गुहा आहेत. एका गुहेत रत्नाईदेवीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये मुक्काम करता येतो. गुहांमधून प्रवरा नदी, रतनवाडी व भंडारदरा धरणाचा अथांग सागर यांचे मनोरम दर्शन होते. 
गुहेच्या 'डोळ्यातून' दिसणारा रतनवाडीचा परिसर 
                         हनुमान दरवाजातून पुढे आपण गडावर येवून पोहोचतो. या दोन्ही दरवाजांवर गणेश, हनुमान व इतर काही देवतांची शिल्पे व सुंदर नक्षीकाम मनोवेधक आहे. शत्रूंपासून वाचण्यासाठी किल्ला भक्कम करतानाच सौंदर्यदृष्टी जोपासण्याची तात्कालीन लोकांची  कलात्मकदृष्टीही वाखाणण्याजोगी आहे. जानेवारीचा महिना असल्याने रानफुलांचा हंगाम संपलेला असला तरी काही रानफुले लक्षवेधून घेत होती. किल्ल्यावर टेहळणीसाठी बांधलेली  एक गोलाकार वास्तू तग धरून आहे. या वास्तुस 'राणीचा हुडा' म्हणून ओळखतात. 
राणीचा हुडा 
येथून आजूबाजूस पाहिल्यावर बराच मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या वास्तुस भेट देवून उजव्या बाजूने उंच वाढलेल्या गवतातून जाणारी पायवाट 'नेढ्याकडे' घेवून जाते. 'नेढे' म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी असणारे छिद्र ! ही एक नैसर्गिक रचना आहे. यातून पलीकडे जाता येते. तत्पूर्वी पश्चिमेला असलेले त्र्यंबक व कल्याण दरवाजे पाहून घ्यावे. हे दरवाजे म्हणजे किल्ल्याची प्रमुख प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे व कातळात कोरलेली वाट पाहून या किल्ल्याच्या भक्कमतेची  साक्ष पटते. पूर्वीची सुरक्षा यंत्रणा पाहता शत्रूस या वाटेने किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होते. हे प्रवेशद्वार व मार्ग म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होय. 
या दरवाजांना भेट देवून नेढ्याकडे वाटचाल करण्यापूर्वी एक वैशिष्टयपूर्ण डोंगर; ज्याला 'खुटा' म्हणतात (जो आपले प्रथम पासूनच लक्ष वेधून घेत असतो) त्याची छायाचित्रे घेण्याचा मोह होतोच. 
नेढे 
नेढ्याची वाट थोडी चढण्यास अवघड वाटते कारण ती मातीची असल्याने निसरडी आहे. ही वाट चढून नेढ्यातून पलीकडे जाताना खूप भारी वाटते. आता आपण पश्चिम बाजूला येतो या बाजूने पाण्याची अनेक टाके दिसतात. गुहेतील पाण्याचे टाके पण आहे. या वाटेने हरीश्चन्द्राच्या डोंगररांगांचे राकट दर्शन व काळजात धस्स करणारी कोकणकड्याची खोली अनुभवता येते. संपूर्ण किल्ल्याला फेरी पूर्ण होवून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतो. खूपच अविस्मरणीय आठवण ठरते ही रतनगडाची सफर! 



अमृतेश्वर मंदिर-
पुष्करिणी 
           रतनवाडी गावातील प्राचीन शिवालय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर दहाव्या-अकराव्या शतकातील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर पुष्करिणी आहे. 
            मंदिरावरील कोरीवकाम खूपच सुंदर आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे बाहेरील बाजू झिजलेली असली तरी नक्षीकामाच्या सुंदरतेची कल्पना येते. आतील सभामंडप अजूनही बराचसा सुस्थितीत आहे. देवादिक, यक्ष-गंधर्व, नृत्यांगनांची सुंदर शिल्पे खांबांवर व भिंतींवर कोरलेली आहे. काही कामशिल्पेही आहेत. गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात असते. सूर्यास्तावेळी या मंदिराचे सौंदर्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो!
अमृतेश्वर मंदिर 
काही क्षणचित्रे:-
किल्ल्यावरील प्रवेशद्वारे 
मुख्य प्रवेशद्वार  
गणेश दरवाजा 
हनुमान दरवाजा 
दरवाजांवरील देवादिकांच्या प्रतिमा खूपच सुरेख आहेत. गणेश, रिद्धीसिद्धी, हनुमान इ. 


खुटा:- रतनगडाच्या चढाईत हा 'खुटा' सतत लक्षवेधून घेत असतो. 

 'खुटा'  








आठवणीतील सुगंध..!

रानफुले-अर्णी

Botanical name: Clerodendrum phlomidis

Family: Verbenaceae

             कधी कधी नेहमीची वाट सोडून आडवाटेने जाण्यातही वेगळी मजा असते. काल असाच एका वाटेकडे मोर्चा वळविला. एक चिरपरिचित सुगंध नाकाला स्पर्श करून गेला. नक्कीच येथे 'ती' असणार असा विचार करायच्या आतच 'ती' दृष्टीस पडली! 'अरुणी' म्हणायचो बालपणी आम्ही तिला! घनदाट वाढणारे हे झुडूप पांढऱ्या फुलांच्या गुच्छांनी बहरले की धुंद करणारा सुगंध वातावरणात तरंगत राहतो. विशेषतः सायंकाळी हा सुगंध अधिकच दरवळतो! आमच्या लहानपणी या झुडुपांची लांबच लांब ताटी रस्त्याच्या कडेला होती. तेथून येता जाता आम्ही तो मस्त सुगंध डोळे बंद करून मनाच्या कुपीत साठवून ठेवायचो. हे झुडूप खूपच दाट, फुले सुगंधित आणि मधुर रसाने भरलेली असल्याने फुलपाखरे व मधमाश्यांची नेहमी वर्दळ येथे असते. मधमाश्यांच्या पोळ्यासाठी ही जागा सुरक्षित असल्याने मधमाश्यांची पोळे हमखास या झुडुपाच्या फांद्यांच्या गर्दीत आढळतात.! या वनस्पतीच्या फुलांचा सुगंध आणि सौंदर्याबरोबरच गोड मधाचा आस्वाद घ्यायचा असेल तर चला रानवाटेवर आणि शोधा तिला.!

ब्युटीफुल म्हातारा?

रानफुले-म्हातारा 

Botanical name- Sonchus oleraceus

Family- Compositae (Asteraceae) 

                                            हा 'ब्युटीफुल म्हातारा' तुम्हाला रानवाटांवर कुठेतरी नक्की भेटेल. ही एक वर्षायू वनस्पती आहे.  शेतात, पिकांत, पडीक जागेवर, गवताळ कुरणांंमध्ये आढळेल! एक तण म्हणून दुर्लक्षित असले तरी याची सोनेरी पिवळी फुले खूपच आकर्षक दिसतात.

 सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर उमलणारी ही फुले दुपार व्हायच्या  आत मिटून जातात. साधारण एक ते दीड फूट उंच वाढते. या वनस्पतीची पाने विचित्र (कातरलेली) आकाराची असतात. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' या लावणी गीतात याचे पान बसत नाही. कारण पानांना देठच नसते. पाने खोडाला चिकटलेली असतात. पानांच्या किनारीवर छोटे काटे असतात. पानांमध्ये कडू, पांढरा चिक असतो.
 
या वनस्पतीचे फळ म्हणजे पांढऱ्या केसांचा पुंजका असतो. हा पुंजका म्हाताऱ्याच्या (सांताक्लॉजच्या?) दाढीसारखा पांढरा दिसतो म्हणूनच या वनस्पतीस म्हातारा  हे नाव पडले असावे.
केसाळ पॅराशूटच्या साहाय्याने या वनस्पतीच्या बिया रुईच्या बियांप्रमाणे (म्हाताऱ्या) वाऱ्याबरोबर दूरवर उडत जातात. ज्या ठिकाणी हे पॅराशूट land होईल तेथील मातीत ते बीज रुजते आणि मग सुरु होतो नव्या जीवनाचा सुंदर प्रवास!