ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

कु...कु...कू कोंबडा

पावसाळा म्हंटला की रानवाटेवर सर्वत्र हिरवळ पसरते. या हिरवळीत वेड्यावाकड्या वाढणाऱ्या वेली, गवत, छोट्या-मोठ्या रान वनस्पती असतात. या वाटेवर असंच एखादं  कुरडूचं फुल आपलं लक्ष वेधून घेतं. टोकाला गुलाबी आणि खाली सफेद असणारे कणासासारखे हे फुल अनेक छोट्या छोट्या फुलांनी सजलेले असते. वाऱ्याबरोबर डोलणारा हा कोंबडा फारच सुरेख दिसतो. चला तर जाणून घेवूया या रानफुलाची माहिती!

 

कुरडू:
Botanical name: Celosia argentea   
Family: Amaranthaceae  

             ही एक लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती आहे. पावसाळ्याच्या शेवटी भारत,नेपाळ, भूतान, चीन, जपान, कोरिया, उष्णकटिबंधीय आफ्रिका खंडात 500 ते 1600 मीटर उंचीवर आढळते. ही हिमालय आणि पश्चिम घाटातही आढळते.एक तण म्हणून या वनस्पतीकडे पाहिले जाते. या वनस्पतीची उंची साधारण 60 ते 75 सेमी पर्यंत असते. खोड व फांद्या पन्हाळीदार, पाने साधी, विविध, एकाआड एक अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी फुले सप्टेंबर–डिसेंबरमध्ये येतात. बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात. 

Celosia plumosa, celosia cristata   या कुरडूच्या काही शोभिवंत जाती बागेत लावतात.

वाळल्यानंतर ही फुले चांदीसारखी चमकदार दिसतात म्हणून इंग्रजीत यांना 'Silver Cockscomb' म्हणतात. मराठीत कुर्डू, कोंबडा या नावांनी ओळखतात. याच्या पानांची भाजीही करतात. चला तर मग रानवाटेवर या कुरडूला शोधायला. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा