रंग बदलणारी फुले.....!
मराठी नावे:- टणटणी, घाणेरी, गुलतुरा
शास्त्रीय नाव (Botanical name):- Lantana camara
कुल (Family):- Verbenaceae
सुंदर आणि विविधरंगी
रंगांच्या फुलांनी नटलेली ही काटेरी वनस्पती महाराष्ट्र व कर्नाटकात मोठया प्रमाणात
आढळते. या वनस्पतीची पाने साधी व खरबरीत असतात. पाने
चुरगळल्यावर उग्र दर्प येत असल्याने कदाचित तिला मराठीत 'घाणेरी' हे नाव पडले
असावे. खरंतर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून पाहुणी म्हणून
आलेली ही वनस्पती येथील वातावरणात इतकी बेमालूमपणे मिसळलीय की ती आता स्थानिक वाटायला
लागलीय. डचांनी हिला प्रथम युरोपात आणली. तेथून ती श्रीलंकामार्गे भारत आणि इतर आशियायी देशांत
पसरली.सदा हिरवीगार असते. वर्षभर रंगीबेरंगी फुलांनी नटलेली असते. विविध फुलपाखरे व मधमाश्यांना आकर्षित करते.
काटेरी (घनदाट) असल्याने व पाने विषारी असल्याने गुरे त्यांना खात नाही. गुरांपासून संरक्षण
होत असल्याने कुंपणासाठी आणि सुंदर
फुलांमुळे बागेत शोभेसाठी या वनस्पतींची सुरुवातीस
लागवड केली गेली. मात्र काही दिवसांतच या वनस्पतीच्या फायद्यांपेक्षा
नुकसानीची जाणीव झाली. ‘भटाला दिली ओसरी नी
भट हातपाय पसरी’ या म्हणीप्रमाणे ही वनस्पती जगभरातील 50 ते 60 देशांत आक्रमकपणे फोफावली. पडीक राने, गवताळ कुरणे, रस्त्याच्या कडेने या वनस्पतींची ताटवे च्या ताटवे
फुलू लागली म्हणण्यापेक्षा फोफोवू लागली. एक #Invasive_species (वेगाने फैलावणारी आक्रमक जात) म्हणून आज ती बदनाम
झाली आहे. या वनस्पतीचे झुडूप खूपच फोफावते साधारण १० ते
१२ फुट व्यासा इतकी उपयुक्त जागा एकच झुडूप
अडवून बसते. गवताळ जागेवर जर असे झुडूप वाढले तर त्याच्या छायेखाली गवत उगवत नाही.
यामुळे गवताळ कुरणे झपाट्याने कमी होण्याचा धोका या वनस्पतीमुळे निर्माण झाला आहे.
फुले यायच्या आधीच ही वनस्पती उपटून टाकणे या एकाच
उपायाने तिचा बिमोड होऊ शकतो. इतर कोणत्याही मार्गाने
तिचा बिमोड होणे अवघड आहे. पर्यावरणवादी आणि शेतकरी
सर्वांनाच या समस्येची जाणीव झाली आहे. या वनस्पतीला हिरव्यागार फळांचे घोष येतात. ती पिकल्यावर काळी होतात. बालपणी बऱ्याच जणांनी या फळांचा आस्वाद नक्कीच घेतला असेल. आम्हीही घेतला आहे. एक मजेची(?) गोष्ट म्हणजे ही फळे विषारी असतात. सुदैवाने आपल्याला काही झाले नाही! पोट दुखी, मळमळल्यासारखे झालेही असेल पण बालपणीच्या नेहमीच्या तक्रारी म्हणून आपण दुर्लक्ष केले असेल किंवा आपले नशीब चांगले म्हणायचे!
आपल्या सुंदर
फुलांनी सृष्टीच्या सौंदर्यात भर घालणारी ही टणटणी सर्वांनाच आकर्षित
करते हे नक्की..! चला तर मग रानवाटेवर या फुलांचे सौंदर्य पाहायला.!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा