हितगुज ..
रान (wood)…एक दोन अक्षरी शब्द! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात. मन पाखरू होते आणि मग ते हिरव्यागार रानावरून फेरफटका मारायला लागते! डोळ्यासमोर बालपण नाचायला लागते आणि पायाखाली असतात त्या 'रानवाटा' ! काही ओळखीच्या काही अनोळखी ! या रानवाटांवर ऐकू येतो पाखरांचा किलबिलाट! बालमित्रांच्या एकेरी हाका आणि खिदखिदाट!कुणाच्या हातात असतात आंबट चिंचा-बोरे तर कुणाच्या हातात हिरव्याकंच कैऱ्या! खरं शेअरिंग तर रानातच व्हायचं…रानमेव्याचे, विचारांचे आणि निर्मळ मनांचे!
मी जन्मलो, वाढलो आणि बागडलो रानातच. घरची गरिबी असली तरी रानाची समृद्धी(हिरवाई) तिची धग जाणवू देत नसायची! सवंगड्यांबरोबर रानवाटा तुडविताना दिवस कसा भुर्रकन संपून जायचा. दुःख, वेदना असं काही असतं असं जर कोणी तेव्हा म्हंटलं असतं तर त्याला आम्ही वेडाच म्हंटलो असतो. या रानवाटांवरून फाटक्या चड्ड्या घालून, अनवाणी पायांनी काट्याकुट्यातून पळताना कधी वेदना जाणवल्या नाही कारण रानाचा गुणच असा होता जिथे वेदनांनाही पराभव मान्य करावा लागायचा.
ती रांनपाखरं, ती रानफुलं, ती रंगीबेरंगी फुलपाखरं, त्या गुंजारव करणाऱ्या मधमाश्या, ते भुणभुणणारे भुंगे, तो आंबट-गोड रानमेवा, तो भरारा रानवारा, ती मंद शीतल झुळूक…तो धुंद कोसळणारा पाऊस,अलगद मंद ओघळणाऱ्या श्रावणसरी…सारं सारं वेड लावणारं! सहा ऋतूंचे सहा सोहळे अद्भुतपणे दाखविणाऱ्या या रानवाटा बालपणापासून वेड लावत आलेल्या आहेत . या रानवाटांवरून हुंदडत असतांना मला भावलेले, मी अनुभवलेले रान…माझ्या नजरेला दिसलेले रान…या रानातील गुजगोष्टी मला आज कुणाशी तरी शेअर कराव्याश्या वाटताय म्हणूनच हा #blog लिहिण्याचं धाडस करतोय. मी कोणी सिद्धहस्त लेखक नाही की कोणी अभ्यासक! मी एक साधा #रानवेडा आहे. आशा आहे आपणांस माझा हा व्यक्त होण्याचा प्रयत्न आवडेल!
वाचन, पक्षीनिरीक्षण, रानफुलांची ओळख, फुलपाखरांचा अभ्यास, रानातील भटकंती आणि जे दिसेल ते वहीत आणि कॅमेऱ्यात टिपण्याचे वेड लागलं ते ह्या रानवाटांवरच ….!
#Twitter वर रानवेडा @fx_format या नावाने मी active असलो तरी. चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी ट्विटर च्या मर्यादा लक्षात घेता अधिक मोठ्या platform ची मला आवश्यकता वाटली म्हणून या ब्लॉगचे प्रयोजन! या ब्लॉगसाठी मला प्रोत्साहीत करणाऱ्या माझ्या सर्व ट्विटरकर मित्रांचे आभार..!
चला तर मग माझ्याबरोबर या रानवाटांवर ..!
आपणांस ब्लॉग कसा वाटला, आपण काही सूचना करू इच्छित असाल तर नक्की लिहा. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत असेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा