रानफुले-म्हातारा
Botanical name- Sonchus oleraceus
Family- Compositae (Asteraceae)
हा 'ब्युटीफुल म्हातारा' तुम्हाला रानवाटांवर कुठेतरी नक्की भेटेल. ही एक वर्षायू वनस्पती आहे. शेतात, पिकांत, पडीक जागेवर, गवताळ कुरणांंमध्ये आढळेल! एक तण म्हणून दुर्लक्षित असले तरी याची सोनेरी पिवळी फुले खूपच आकर्षक दिसतात. सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर उमलणारी ही फुले दुपार व्हायच्या आत मिटून जातात. साधारण एक ते दीड फूट उंच वाढते. या वनस्पतीची पाने विचित्र (कातरलेली) आकाराची असतात. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' या लावणी गीतात याचे पान बसत नाही. कारण पानांना देठच नसते. पाने खोडाला चिकटलेली असतात. पानांच्या किनारीवर छोटे काटे असतात. पानांमध्ये कडू, पांढरा चिक असतो.
या वनस्पतीचे फळ म्हणजे पांढऱ्या केसांचा पुंजका असतो. हा पुंजका म्हाताऱ्याच्या (सांताक्लॉजच्या?) दाढीसारखा पांढरा दिसतो म्हणूनच या वनस्पतीस म्हातारा हे नाव पडले असावे.
केसाळ पॅराशूटच्या साहाय्याने या वनस्पतीच्या बिया रुईच्या बियांप्रमाणे (म्हाताऱ्या) वाऱ्याबरोबर दूरवर उडत जातात. ज्या ठिकाणी हे पॅराशूट land होईल तेथील मातीत ते बीज रुजते आणि मग सुरु होतो नव्या जीवनाचा सुंदर प्रवास!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा