ब्लॉगविषयी थोडेसे...

हितगुज ..                      रान (wood) … एक दोन अक्षरी शब्द ! पण हा शब्द उच्चारला की मनात आल्हाददायक तरंग उमटतात . मन पाखरू ...

आरोग्यवर्धक रानभाज्या

 माठ व तांदुळ कुंद्रा  

        श्रावण सरींचा वर्षाव झाला की जमिनीत निद्रिस्त असणाऱ्या बीजांना धुमारे फुटतात आणि त्यातूनच जन्म घेतात काही रानभाज्या! शेतातील तण म्हणून किंवा गुरांचे खाद्य म्हणून सामान्यपणे दुर्लक्षित होणाऱ्या काही रानभाज्या या चविष्ट आणि आरोग्यवर्धक असतात. आपल्या आहारात त्यांचा समावेश जाणीवपूर्वक करायला हवा. रानभाज्यांमध्ये क्षार व जीवनसत्वे असतात. तसेच फायबर-जे की अन्न पचायला मदत करतात- भरपूर असतात. पोट भरण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचे काम या रानभाज्या करतात. मग चला तर रानवाटेवर आणि जाणून घ्या काही रान भाज्यांबद्द्ल.

माठ
Botanical name: Amaranthus viridis 
Family: Amaranthaceae
        ही एक वर्षायू वनस्पती आहे. पावसाळ्यात शेतात व इतरत्र उगवते. ग्रामीण भागात अगदी चवीने खाल्ली जाणारी ही भाजी आहे. आमची आज्जी नेहमी म्हणायची ही देवांची आवडती भाजी आहे. धार्मिकदृष्ट्या हिंदुधर्मात या भाजीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
        'श्रावण महिन्यात दर शनिवारी हिंदू लोक पंच-भेळी-भाजी नावाची भाजी करतात. त्यातील पाच भाज्यांत माठाचा समावेश असतो. ही भाजी देवांना आवडते अशी समजूत आहे. इतर चार भाज्या उपलब्ध नसल्या, तरीही फक्त माठाची भाजी करतात, एवढे त्या भाजीचे महत्त्व आहे.' अशी माहिती मराठी विश्वकोशात  या भाजीबद्दल दिलेली आहे.
        अशा या चविष्ट भाजीची चव एकदा चाखायलाच हवी.
 


तांदुळ कुंद्रा 
Botanical name: Digera muricata
Family: Amaranthaceae 
        मराठीत गेठण,कुंजर या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीच्या पानांची भाजीही चविष्ट असते.या भाजीच्या फुलांच्या मंजिऱ्या तांदळाच्या दाण्यांसारख्या दिसत असल्यामुळे तिला मराठीत तांदुळ कुंद्रा म्हणत असावेत!
        ही भाजीही वर्षायू असून पावसाळ्यात उगवते. 
        रानभाज्यांची पाककृती अगदी सोपी असते. तेल, तिखट, मीठ एव्हढे असले तरी पुरेसे असते. 
इतर कोणतेही चविष्ट मसाले न वापरता या भाज्या शिजविल्या तरच  त्यांची खरी नैसर्गिक चव कळते. या भाज्या शिजविताना पाणी टाकून शिजविण्याची अजिबात गरज नसते. पानांमधील पाणीच पुरेसे ठरते. भाजी शिजताना आपोआप हे पाणी बाहेर पडते. 
चला तर मग या भाज्यांचा भरपूर आस्वाद घेवूया.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा